मुंबई एक न पाहिलेलं स्वप्न.....!

GAVRAN SMART BOY IN THE MUMBAI....!

लहानपणी tv मध्ये सतत पाहिलेलं एक शहर, खूप काही भावना, स्वप्न आणि भविष्य होत ह्या शहराबद्दल माझ्या मनात, किती सुंदर असेल ना! हिरो, हिरोईन पण किती जवळून पाहायला भेटतील ना! भारी भारी गाड्या, गगनचुंबी इमारती, वाव कित्ती मज्जा येईल ना तिथे जायला!!!!!!!
        दर शनिवार - रविवारी दूरदर्शन वर लागणाऱ्या चित्रपटात पाहून या सर्व भावना मनात गोंधळ घालायच्या! मग काय मनातल्या मनातच अक्खी मुंबई फिरून यायचो मी. माहिती नव्हतं कधी जाण्याचा योग येईल का नाही ते सुद्धा, आणि कदाचित परिस्तिथीमुळे कधी मुंबई ला जाण्याचं स्वप्न हि पडलं नसावं किंवा बघितलं नसावं. करण मुंबई म्हंटल तर पैसा जवळ असावा लागतो आणि पैसा म्हंटल तर तो आपल्याकडे कुठंय?????
          असा प्रश्न पडून मुंबई ला जायचं या स्वप्नाने कधी डोकच वर केलं नाही. पण असेच tv मध्ये मुंबई बघता बघता प्रत्यक्षात मुंबई बघण्याचा एकदा योग आला, तेव्हा मी आठवीच्या सेमी मध्ये शिकत होतो. ऐन घटक चाचणी च्या दरम्यान हा योग आलेला! म्हणून कस करावं हा मोठा प्रश्न पडला. अभ्यासाचा प्रचंड कंटाळा असल्या कारणाने शाळा फक्त एक formality  होती माझ्या साठी! त्यामुळे आलेल्या योगा चा लाभ घेता यावा म्हणून घटक चाचणीला दिला दंडा, आणि फॅमिली टूर सोबत गेलो की महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुबंई बघायला. आयुष्यात पहिल्याच वेळेस कुठेतरी दूर फिरायला गेलो होतो फॅमिली बरोबर आणि त्याच बरोबर tv मधलं शहर प्रत्यक्षात बघायला भेटणार होतं, त्याची उत्सुकता काही वेगळीच होती.
             झाले मुंबई चे दर्शन, ते काहीतरी गजबच होतं, कित्ती गर्दी काय ती धावपळ, लोकल, नुसता घाम बाप रे बाप कशी राहत असतील यार ही लोकं इथे??!?!?? असले विचार डोक्यात नुस्ते घोंगावत होते, पण मस्त तर आहे हं, जुहू चौपाटी, मारीनलाईन, गेट वे ऑफ इंडिया चिकार समुद्रकिनारा लाभलेलं असं शहर म्हणजे आपली मुंबई. तेव्हा मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून असा हि आवाज यायचा कि यार आपलं हि एक घर इथे असतं तर किती मस्त ना! पण काय, नशिबाने बघायला भेटली तेच खूप झालं, घर तर स्वप्नातच होऊ शकतं. असं म्हणून आमची ट्रिप झाली खरी, पण मुंबईच भूत मात्र निघायला तयार नव्हतं, जो भेटेल त्याला मुंबई च तोंड भरून कौतुक करून सांगायचो, मुंबई असं मुंबई तसं.
        हळू हळू मुंबई बघण्याचे योग बऱ्याच प्रमाणात वाढले, मी हि वयाने मोठा झालो होतो, मनाने मात्र अगदी लहानच होतो, नंतर तर असे योग ताईच लग्न झाल्यावरच आले, कारण भाऊजी नेरळ ला शिक्षक होते, मग तर दर 2 महिन्याला मुंबई ला चक्कर असायची. ते अनुभव जरा सांगतो, एकदा ताईला भेटायला आलो आणि थोडी खरेदी करावी म्हंटल म्हणून सकाळी निघालो खरेदी करायला कल्याण पर्यंत, आणि तिथे चुकून लगेज च्या डब्ब्यामध्ये बसलो, आणि मग काय RPF सज्जच होती, पकडलं!! माझ्या सोबत आणखी हि भरपूर जणं होती, खरतर तो पोलीस बाकीच्यांना पकडत होता, मला वाटलं त्यांच्याकडे तिकीट नाही म्हणून पकडत असेल माझ्याकडे तिकीट आहे, तर मी त्या पोलिसाच्या समोर त्या डब्ब्यात चढलो आणि त्यांनी ज्यांना पकडले होते ते मोजले आणि त्यात एक कमी पडत होता कदाचित मग काय ओढलं मला, मी मात्र परेशान कसकाय पकडलं कळायला तयार नाही. एक छोटीशी रूम तिथे सगळ्यांना बंद केलं, तेव्हा आमच्याकडे मोबाईल इतका भारी होता की त्यावर फक्त दिसायचं पण एकही बटन चालत नव्हतं, ना फोन उचलता येत होता ना लावता येत होता. मग काय म्हंटल बसा आता काय. अक्खा दिवस त्या बारीक खोलीमध्ये काढला, मग 4 वाजता कोर्टात नेलं, फाईन घेतला आणि दिल सोडून. डोक्याला हात लावला आणि म्हंटल भावा चांगलीच खरेदी निघाली, चला आता घरी, सकाळपासून उपाशी-तापाशी फुकटचा फाईन भरावा लागला होता.
        तेव्हा फाईन तर भरला पण कानाला खडा लावून आजुनही मी त्या लगेज च्या डब्ब्याकडे बघत असतो. चांगलीच अद्दल घडवली होती मला, वाईट खूप वाटत होतं, राग हि खूप येत होता सिस्टीम चा. पण काय करणार आपली फक्त आपल्या गावात चालते आणि आपलं गाव इथून 500 किमी वर आहे. गप्प मूग गिळून चालता झालो. अशे अनेकदा प्रसंग आले. पण मस्त वाटायचं, कारण मुंबई च्या रेल्वे जेल मध्ये एक अक्खा दिवस राहिलो असं भरदार वाटायचं.
          नंतर ताई भाऊजी गावाकडे राहायला आले, मग तर मुंबई चा आणि माझा समंध थोडा तुटला होता, नंतर मी नाशिक मध्ये आलो, मग दिवाळी च्या खरेदीला एकदा आलो होतो खरेदी केली आणि निघून गेलो. पण वाटलं नाही तेव्हा ही कि मुंबई सारख्या ठिकाणी आपण राहन्यासाठी येऊ.
             आता सद्यपरिस्तिती बद्दल काही....!
नाशिक मधील उच्च पदवी चे पेपर जवळ आले होते, ते झाल्यानंतर पुण्याला जायचं असं सगळं फिक्स होतं, पण असाच एका इंटरव्हिव चा योग आला, (उर्मी फाउंडेशन म्हणून मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेचा) म्हंटल चला देऊन तर बघू, नियुक्ती तर नाही होणार पण त्या निमित्ताने थोडी मुंबई ची सैर होईल, आणि खरेदी हि. मग काय आलो इंटरव्हिव दिला आणि निघालो खरेदीला, थोडं फिरलो, कपडे घेतले आणि दिवस मावळतीला नाशिककडे रवाना झालो. दोन तीन दिवसानंतर कॉल आला,!!!
         "GOOD MORNING MR. गणेश डोंगरे मी उर्मी फाउंडेशन मधून संगीता (Mental health team project head) बोलते आहे, आमच्या फाउंडेशन मध्ये तुमची नियुक्ती As a CLINICAL PSYCHOLOGIST म्हणून करत आहोत, तरी तुम्ही येत्या 15 मे पासून ट्रेनिंग ला यावे" थोडा वेळ तर मेंधू हँग झाला, आतल्या आतच अस गद-गद होत होतं, मुंबई मध्ये मी जॉब करणार!!! मी तिथल्या लोकांसोबत राहणार!!! तिथे नाव गाजवणार!! काय काय विचार विचारूच नका. असा एकंदरीत आनंदी आनंदच होता.
        पण, मुंबई सारख्या शहरात, ना कोणाशी ओळख, ना कोणी नातलग, रूम कुठे भेटणार!?? जेवणाची सोय कशी असेल!?? लोकल चा प्रवास!?? धावपळी चे जीवन!?? अशे चिकार प्रश्न माझ्या मनात नकळत घर करत होते, पण म्हंटल होईल व्यवस्तीत चला तयारीला लागा, आधी पेपर संपूद्या नंतर बघू, म्हणून त्याकडे एवढं लक्ष्य नाही दिल, पेपर झाले, मग रूम च्या शोधात लागलो, ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव, तेव्हा कळालं कि एका सामान्य माणसाला मुंबई मध्ये राहणं किती कठीण आहे ते, कारण रूम भेटायला तयार नाही, आणि भेटली जरी, तरी तिचे भाडे आणि डिपॉजीट मला न परवडणारे होते, असं करून करून 14 तारीख जवळ आली, उद्या आपला पहिला दिवस!? अजून काहीच ठाव ठिकाना नाही, माझी जरा तारंबळच झाली. कसातरी भाऊजिच्या वाशिल्याने एका ठिकाणी एका रात्रीचा निवारा शोधला, तो ठाण्यामध्ये, 14 तारखेला 8 वाजता ठाणे ला आलो, तिथे भाऊजीचा मित्र मला घ्यायला आला, तिथून आम्ही हॉटेल वर गेलो जेवलो नंतर त्याने मी ज्यांच्या रूम वर थांबणार होतो त्यांच्याकडे सोडलं, तिथपर्यंत सगळं काही मस्त होतं, पण नंतर त्या पोरांची सुट्टी होईपर्यंत तिथेच बसलो, नंतर 11 वाजता सुट्टी झाल्यानंतर त्यांच्या रूम मध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर मी काय बोलू, आणि कसं बोलू असं झालं होतं, नशिबाला दोष देत माझं मन म्हंटल कशालाच आलो असेल यार आपन इकडे!!?!?!?!
         6 बाय 8 ची ती रूम त्यातच किचनवटा, बाथरूम आणि तिथेच झोपायचं, एवढंच नाही तर त्या रूम मध्ये राहणाऱ्या मुलांचे शब्द ऐकून तर माझी मुंबई मध्ये राहण्याची इच्छाच राहिली नव्हती. त्याच रात्रीत मी तो हाती आलेला जॉब सोडायचे सुद्धा स्वप्न पाहिले, सकाळी मात्र 6 लाच उठून आवरून स्टेशन वर गेलो, तिथे नास्ता केला आणि कुर्ला ची गाडी पकडून टिळकनगर स्टेशन ला गेलो, तिथे ऑफिस. वेळ 10 ची दिलेली होती पण मी 8.30 लाच तिथे पोहोचलो होतो, दमट वातावरणामुळे घामाने ओलाचिंब झालेलो, बसलो स्टेशन वर, चहा घेत दमट वातावरणाचा आनंद घेत बसलो 10 वाजेची वाट पाहात.
         वेळ झाल्यावर ऑफिस वर गेलो, तिथे संगीता मॅम होत्या, मग त्यांनी विचारलं रूम च फिक्स झालं का? रेग्युलर येणार ना!? तर त्यांना बोललो कि रूम च अजून तरी फिक्स नाही म्हंटल, मला सोमवार पर्यंत वेळ द्या मी नंतर रेग्युलर करेल. त्या बोलल्या ठीक आहे आजचा फुल डे कर आणि मग डायरेक सोमवारी ये, थांबलो मग, तो दिवस काही मस्त होता! गरम तव्यावर बसून आईस गोळ्या खाल्ल्यासारखा! हळू हळू दिवस गेला आणि माझं रूम च मंत्र परत कानात गुणगुणायला लागलं, भाऊजी राहत होते तिकडे नेरळ च्या पुढचं एक स्टेशन भिवपुरी रोड म्हणून, तिथे मला कमी रेंट मध्ये चांगल्या रूम होत्या, पण तिथून माझ्या ऑफिस ला यायला दीड तास आणि जायला दीड तास लागतो, मग तर माझी गोचीच झाली, तरी म्हंटल आहेत अजून तीन चार दिवस, तोपर्यंत भेटली जवळ कुठे तर ठीक नाही तर करू अप्-डाऊन, खूप प्रयत्न केले, कुठे भाडे जास्त, तर कुठे रूम छोटी काही न काही अडथळे येतच होते. अखेर शनिवार दि. 19/04/2018 या दिवशी भिवपुरी ची रूम फिक्स करायचं ठरवलं, आणि जेव्हा तिकडे भेटेल तेव्हा ही सोडून तिकडे जाऊ असं ठरवलं आणि आलो कपडे आणि 2 पुस्तक घेऊन. ओझं म्हंटल कि मला फासाला लटकवल्यासारखं वाटे, म्हणून बाकीचं पुढच्या रविवारी घेऊन येऊ असं म्हणून जेमतेमच साहित्य घेऊन आलो! रूम वर आलो, थोडं बसलो , नंतर मार्केट मध्ये गेलो, गरजेचं साहित्य घेऊन आलो, अर्थात मी तर त्याला संसार म्हणेल! येताना बाहेरूनच जेऊन आलो, रूम जवळच मेस होती तिथे उद्यापासून जेवायला येईल असं सांगितलं. असे एकंदरीत रात्री 11 वाजले, या वेळेला मी वामकुक्षी मध्ये केव्हाच डुंबलेलो असायचो, पण आज काही माझे नेत्र झोपायच्या तयारीत दिसत नव्हते, 12 वाजले 1 वाजले हळू हळू 3 वाजले तरी झोप यायला तयार नाही, आयुष्यात पहिल्याच वेळेस असं झालं की मला नवीन जागेवर झोप येत नव्हती. नंतर केव्हा लागली कळलंच नाही, सकाळी 8 ला उठलो आणि आज सगळी रूम स्वच्छ करायचं असं ठरवलं, मग काय! लागलो कामाला, सगळं आवरून मेस च जेवण जेवायला जाणार होतो, त्याआधी देवाला हजार विनवण्या "देवा जेवण चांगलं असू दे रे बाबा" जेवण तस जेमतेम आणि छान होतं, कदाचित माझा पहिला दिवस असल्यामुळे मला ते छान लागलं असावं. जेवण करून आलो, बसलो जरावेळ थोडं थोडं वाटलं की एकंदरीत आपण मुंबई मध्ये राहायला तर आलोच...!
      
         आणि मुंबई मध्ये राहण्याचं न पाहिलेलं स्वप्न पूर्ण मात्र झालं......!!!

                             -- ग. सु. डोंगरे
                            (8605522285)

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!