मायेची ओढ....!

चार महिन्यानंतर जेव्हा बाहेर राहणारं पोर घरी जातं तेव्हा त्याचा आनंद काय असेल?

हा आनंद अनुभवायला खूप काही सोसावे लागले, ते मेस चे जेवण, रोज रोज प्रवास करून कामाच्या ठिकाणी जाणं, रूम वर राहणं, सगळं काही वेळेवरच, पाहिजे तेव्हा काहीच नाही, अगदी बाहेरचं आयुष्य...!
        नाशिक मधे उच्च पदवी चे शिक्षण घेऊन मुंबई सारख्या नगरी मधे समोरचं काही आयुष्य घालवण्यासाठी गेलो, तशी मुंबई म्हणजे माझ्या मनात काय, हे माझ्या 'मुंबई एक न पाहिलेलं स्वप्न' या लेखा मध्ये मी निरागसपणे मांडलेलं आहे..!
    असो....
           मुंबई म्हणजे माझ्या मनात एक वेगळाच तरंग होता, पण जेव्हा इथे आलो, आता मुंबईचं प्रत्यक्ष जीवन जगतोय, तेव्हा कुठे कळतं आहे की मुंबई खरी काय आहे! धकाधकीचे जीवन, रोज उठून नुसतं पळायचं, ट्रेन च्या वेळेवर आणि तालावर नाचायचं, बस्स रोजची ट्रेन पकडायची, त्याच वेळेची तीच ट्रेन, त्याच ट्रेन चा तोच डब्बा, त्याच डब्ब्यातली तीच सीट, एवढंच आयुष्य! दीड दोन तासाचा प्रवास पूर्ण करून कामाच्या ठिकाणी उतरायचं, उतरताना आणि चढताना मात्र रणांगणातील युद्धाचा प्रसंग असतो, सुखरूप चढलो किंवा उतरलो म्हणजे युद्ध जिंकल्याचा आनंद मिळतो, असे रोजचे युद्ध जिंकून कामाच्या ठिकानाकडे धावायचे, लेट मार्क लागतो कि काय या चिंतेत पळत सुटायचे. दिवस भर पळ पळ करून दिवसाचे काम पूर्ण करायचे आणि परतीच्या प्रवासाला निघायचं....!
          असेच चार महिने तारेवरची कसरत करून घरी जाण्याचे योग ते! दिवस भर काम करून रात्री निघायचं होतं, अंगात ताप, आणि सर्दी ने भरलेलं नाक, असं असून अंगात उभं राहायची सुद्धा ताकद नव्हती तरी पण चार महिन्या नंतर घरी जायची किती तीव्र इच्छा असेल, त्या इच्छे पाई ना अंग दुखल ना ताप वाढला, जशी सुट्टी झाली तस पळत सुटलो, मुंबई वरून कर्जत , कर्जत वरून पुणे आणि पुणे वरून रात्री ची ११.३० ची डायरेक्ट अंबड गाडी, कधी त्या गाडीत बसेल असं झालं होतं, फायनली १०.३० वाजता गाडी जवळ पोहोचलो, महामंडळ घरचं असल्यामुळे सुदैवाने गाडी कोणती जाणार आहे, त्या गाडी चा नंबर आधीच माहिती होतां, बसलो गाडीत, थोड्या वेळाने कंडक्टर काका आले, आणि बोलले कि सगळे सीट रीजर्व आहेत, जरा टेन्शन आलं, पण उभं राहून का होईना आजच जायचं असं ठरलेलं, थोड्या वेळात मित्र आले एका बस मध्ये 4 सीट पकडून ठेवले त्यात माझी बॅग एका सीट वर मी एका सीट वर आणि दोन मित्र दोन सीट वर असे चार सीट पकडले, हळू हळू बस भरत गेली चार पैकी तीन सीट रिजर्व वाले होते, बस निघायला 10 मिनिटं बाकी होते, आता फक्त माझी बॅग जिथे होती तेच सीट बाकी होतं, बाकी पूर्ण बस भरली, आता इथे कोणी येऊ नये या चिंतेत मन गुंतलेलं, बस निघायची वेळ झाली अखेर बस निघाली, माझी ख़ुशी तर गगनात मावत नव्हती, बॅग खाली ठेऊन बसलो त्या सीट वर, खरच मी नशीबवान आहे याची परत एकदा जाणीव तेव्हा झाली. बस आता सकाळची वाट पाहत होतो, कधी घरी पोहोचेल, दुखणं माझं थोडं पळून गेल्यासारखंच झालं होतं, पण म्हंटल आज रात्र भर प्रवास करून परत बिघडेल, पण जसा सकाळी घरात गेलो तशी आई दिसली, सगळा थकवा, आजार तिथेच अंग सोडून पळून गेला, मन असं भरून आलं, माय माऊलीची काय किंमत असते ते तेव्हा कळले, तो आनंद अनुभवून असं वाटत होतं की कदाचित स्वर्गात यापेक्षा जास्त आनंद नसावा..! बस तिच्या हातचा अन्नाचा घास कधी घेईल असं वाटत होतं, पटकन आवरलं आणि पोटभर जेवण केलं, या चार महिन्यात कदाचित मी तेव्हा पोटभर जेवण केलं असं मला वाटत होतं...!
       ५ दिवस सुट्टी मिळालेली, कुणीकडे कशी गेली कळालं सुद्धा नाही, अखेर परत निघायचं होतं, काही कारणामुळे मी आणखी जास्त दिवसाची सुट्टी नव्हतो घेऊ शकत, घरातून निघायची इच्छा मात्र बिलकुल होत नव्हती...! कसा बसा घराबाहेर निघालो, आई, आजी, ताई गेट पर्यंत सोडायला आले, त्यांची ती व्याकुळलेली नजर नजरेला भिडवत नव्हती, भिडली असती तर अश्रू अनावर झाले असते...!
            अगदी छोटी गोष्ट, त्याचं एवढं काही होतं, तर जे कोणी जवान असतील ते तर चार महिन्यापेक्षा जास्त वेळ सीमेवर असतात, काय वाटत असेल त्या जीवाला...! खरच सलाम त्या सर्व जवानांना जे आपलं घर दार परिवार सोडून दूर कुठेतरी एकटे राहतात. डोळ्यातील अश्रू आतल्या आतच आटवून घरातून चालता झालो, परत आलो दररोज ची गाडी ढकलायला....!

                                  -- ग. सु. डोंगरे

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!