एक नवा विवेकानंद.....!

माझ्या पदव्युत्तर शिक्षणाच्या दरम्यानचा हा एक प्रसंग...!

कॉलेज ला असताना मी आणि माझा मित्र रोज ग्रंथालयात अभ्यास करत बसायचो, खरतर मी फक्त अभ्यासाचं ढोंग करत असे, तो मात्र पक्का अभ्यासू...! सतत आमची हि गाडी चालू असायची, सर्व lectures झाले, कि सगळ्यांसोबत आणलेला डब्बा खायचा, आणि नंतर ग्रंथालयात जाऊन बसायचं,
माझा मित्र, खूप sincere तो दिसण्यात हि, आणि वागण्यात सुद्धा, तसाच तो अभ्यास हि करायचा,
पण मी मात्र दिस्तानाच टपोरी,,
त्यात माझं वागणं आणखीनच टपोरी..!
पण सगळ्यांना प्रश्न असा पडे कि इतका टपोरी दिसतो, पण हा ग्रंथालयात तासन-तास कसा बसतो,
कारण टपोरी म्हंटल्यावर कट्ट्यावर बसणारं पोरग,
पण माझं चित्र काही विचित्रच होतं,
तसा मी मनाने साफ, आणि शुद्ध हेतू असणारा होतो, फक्त राहायला तस आवडतं,, म्हणून राहायचो..!

तर अशाच आमच्या सतत चालणाऱ्या गाडी मधे अनेक प्रवाशी आम्हाला बघायचे,
त्यातलाच हा एक..!
ज्याचं नाव विवेक राजेंद्र खाडे...

दररोज आमच्या दोघांचं निरीक्षण करे, हे आम्हाला कधी लक्षात नाही आलं, पण असच योगायोगाने, आमच्या वर्गामधे विवेक आणि त्याचा मित्र डब्बा खाण्यासाठी आले, आमचा classmates चा सर्व ग्रुप नुकताच डब्बा खाऊन मोकार गप्पा मारत होता, त्यात माझा आवाज जरा जास्तच असायचा, आणि माझी भाषा गावरान मराठी असल्या कारणाने माझे बोलनं सगळ्यांना आकर्षित करायचं, मग तेव्हा विवेकची अन माझी तोंड ओळख झाली,
असच दररोज च्या गाडीमधे तो हि आला, म्हणजेच ग्रंथालयात आमच्या सोबत, हळू-हळू आमची मैत्री घट्ट झाली, तो नेहमी बोलता बोलता मला म्हणायचं "आयला गणेश दादा तू खूप भारी आहे राव" मला जरा गोड वाटायचं असं ऐकल्यावर, पण त्याच हे म्हणण्याचं प्रमाण जरा जास्तच झालं होतं, म्हणून मी एकदा त्याला म्हंटलो,
"अरे विवेक तू ना माझ्या बद्दल तुला काय वाटत, माझ्यातल्या तुला आवडणाऱ्या गोष्टी, आणि न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा सगळ्या लिहून काढ आणि मला दे....."
तेव्हा तो म्हणाला हो नक्कीच देईल,
मग मधेच परीक्षाच काळ आला, माझ्या हलगर्जी पणा मुळे माझ्यावर एकाच सत्रामध्ये दोन लग्न होते, म्हणजेच दोनीही सत्रांची परीक्षा मला एका सत्रात देऊन पास व्हायचं होतं..!
त्यामुळे मी त्या राड्यातच असायचो, त्या नंतर आमचं भेटणं जरा पातळच झालं, पण परीक्षा झाली, त्याने पण बी. एस. सी प्रथम वर्षाची परीक्षा दिली होती,,
परत, पदव्युत्तर शिक्षणाचं दुसरं वर्ष चालू झालं,
पहिल्या वर्षाचा निकाल लागला, मी दोन्हीही सत्र चांगल्या गुणांनी पास झलो होतो, खरतर आयुष्यात पहिल्या वेळेस इमानदारीने, अभ्यास करून पस झालेलं माझं पाहिलंच वर्ष असावं,
हळू-हळू कॉलेज परत चालू झाल, विवेक परत भेटला, त्याचा हि निकाल लागला, पण त्याचा एक विषय राहिला होता, त्याच कारण मी न विचारता मी त्याला फक्त एक वाक्य बोललो, "जो गेला तो परत काढतां येईल भाई, जे निघाले ते बघ"......!
असं म्हणून मी चालता झालो,
या सत्रात त्याच येणं फारस दाट नव्हतं,
आठ-पंधरा दिवसातनं एखाद्या वेळेस दिसायचा,
एकदा भेट झालीं म्हंटल
"काय रे विवेक आजकाल जास्त दिसत नाही"
तर तो म्हणाला "अरे कॅम्प ला गेलो होतो"
मग तिथे काय केलं हे विचारलं, त्याने सांगितलं तिथे काय झालं,
म्हंटल मज्जा आहे बाबा तुझी, आमचं काय नुसतं कॉलेज,,,
एवढं बोलून चालते व्हायचो आम्ही, त्याचे सर्व कॅम्प, वगैरे सगळं संपवून तो परत पहिल्या सारखं यायला लागला, या सत्रात मात्र माझं ग्रंथालयात आधीच्या पेक्षा जास्त वेळ बसणं असायचं, तर तो हि यायला लागला होता,
तर सहज गप्पा मारता मारता त्याने एक आनंदाची बातमी सांगितली, कि मला आर्मी मध्ये ग्रीन कार्ड मिळालं, (गरुड कमांडो) याच्या शारीरिक चाचणी मध्ये तो उत्तीर्ण झाला, मी म्हणलं तू आत्ता सांगतोय??
तर तो म्हणे अरे मला जेव्हा ट्रेनींग च लेटर येईल तेव्हाच सांगणार होतो, पण तुला आत्ताच सांगतोय, बाकी कोणाला माहिती नाही, आणि कोणाला सांगू पण नको....!

मला हे गरुड कमांडो नुसतं माहिती होत, पण त्याची चाचणी कशा प्रकारची असते हे माहिती नव्हतं, तर त्याला विचारलं नेमकं काय असत हे, कस असत? काय केलं तू
तर विवेक ने जेच सांगायला सुरुवात केली..…

हे कि..
पहिल्या वर्षाची परीक्षा नुकतीच झाली होती.  सकाळी 9 वाजले होते माझा सैनिक स्कूलचा मित्र अमितचा फोन आला की इंडियन ऐरफोर्सची भरती आहे आजच्या लोकमत पेपर ला बातमी आली आहे
माझ्या कडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता काकांचा मोबाइल घेतला आणी गुगल वर सर्च केलं पेपरच ते पान मला सापडलं
अमितने फोन ठेवला तस मनामध्ये चलबिचल सुरू झाली होती
पहिल्या पासुन कधीच भरतीचा विचार केला नव्हता
आर्मीत जायचं हे नक्की होत पण ऑफिसर म्हणूनच कारणही तसंच होत. अकरावी आणी बारावी हे दोन्ही वर्ष विखे पाटील सैनिक स्कूल मध्ये झाले होते त्यामुळे मुळातच ते रुजलं होत की आर्म्स फोर्सस मध्ये ऑफिसर म्हणूनच जायचं
ते पान डाउनलोड झाल्यानंतर वाचायला सुरुवात केली 2 ट्रेड साठी भरती होती इंडियन ऐरफोर्स सिक्युरिटी आणि मेडिकल असिस्टंट दोन्ही साठी मी पात्र होतो
भरतीची तारीख 8 आणी 9 मे होती माझा
हातात 20 दिवस होते
जावं तर लागणारच होत त्याला काही प्रमुख कारणं होती
त्यातलं पाहिलं की वडिलांची खूप इच्छा होती की त्यांनी सैन्यात जावं पण त्यांची उंची कमी असल्यामुळे त्यांना तीन वेळा बाहेर काढलं
वडिलांनी लहानपण पासूनच आर्मी च स्वप्न दाखवलं होत आणि ते माझ्या आयुष्याचं ध्येय बनलं होत नुकतंच वडिलांचं आजारी असल्या कारणाने निधन झालं होतं.
दुसर कारण म्हणजे मी अकरावी आणि बारावी ह्या दोन वर्षात एनडीए च्या तीन परीक्षा दिल्या होत्या आणि त्या तीनही परीक्षेत मला यश मिळालं नव्हतं त्यामुळे घरच्यांचा मनामध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला होता
तिसरं कारण होत ते  म्हणजे घरची परिस्थीती, मी एकत्र कुटुंबात राहत होतो घरामध्ये नऊ जण होते आणि ही संपूर्ण जबाबदारी काका आणि बाबा दोघे जण सांभाळत होते आजोबांच्या दहा हजाराच्या पेन्शन वर आणि काकांच्या दोन एकरातील शेतीच्या उत्पन्नावर हे नऊ जणांचं कुटुंब चाललं होतं.
घरातील कोणीच नोकरीला नव्हतं
या सर्व गोष्टी कारणीभूत ठरल्या मी भरतीची तयारी सुरू करण्यासाठी.
चौथ कारण म्हणजे माझी सैनिक स्कूलची फी भरण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा बाबांनी त्यांच्या बँकेतून कर्ज काढून थोडी रक्कम व काकांनी त्यांच्या मित्रांकडून थोडी उसनवारी घेऊन फी भरली होती.

भरतीसाठी लागणारे सर्व कागदपत्रे माझ्याजवळ होती. मी इंडियन ऐरफोर्स सिक्युरिटी ट्रेड विषयी गुगल वरून सर्व माहिती काढली आणि धक्का बसला . IAF(S) म्हणजे  गरुड कमांडो स्पेशल फोर्स. जो माझा बॅकअप प्लान होता.

मला भारतीय वायुसेने मध्ये लढाऊ वैमानिक व्हायचे होते आणि नाहीच झालो तर ग्राउंड ड्युटी मध्ये गरुड कमांडो हा माझा बॅकअप प्लान.
पण आता परिस्थिती अशी झाली होती की बॅकअप प्लान म्हणजेच प्लॅन बी प्लान ए च्या आधी वापरावा लागणार होता.

एकूण 4 परीक्षा मला पास करायच्या होत्या त्यामध्ये फिजिकल फिटनेस टेस्ट, 2 लेखी परीक्षा, 3)सायकॉलॉजि टेस्ट , 4) ग्रुप डिस्कशन
मी ह्या चारही परीक्षांची तयारी टप्याटप्याने करायची ठरवलं .
आणि सुरुवात केली फिजिकल ने , फिजिकल मध्ये प्रामुख्याने चार प्रकार असतात
1) 1600 मीटर रंनिंग, 5 मिनिटे आणि 40 सेकंदात
2) 8 पुलअप्स
3) 20 पुशअप्स
4) 20 सीटअप्स
संध्याकाळी ग्राउंड वर आलो आणि  प्रॅक्टिसला सुरुवात केली 1600 मीटर चा टायमिंग घेतला.
पहिल्याच दिवशी 9 मिनिटे आणि  53 सेकंद असा आला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तोच टायमिंग
मी थोडा निराश झालो होतो कारण 19 दिवसांमध्ये 4 मिनिटे कमी करायची होती.
ठरवलं की आता सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करायची आणि तशी सुरू केली.
ग्राउंड घरापासून तीन किमी. अंतरावर होत. ग्राऊंडवर जाण्यासाठी गाडी नव्हती आणि पायी गेल्याने वेळ खूप जाणार होता , म्हणून शेजारी राहणाऱ्या काकांची सायकल त्यांच्याकडून 15 दिवसांसाठी मागून घेतली.
सकाळी 3 किमी सायकलिंग करत ग्राउंड वर जायचं , 2 किमी रंनिंग करायची रंनिंग झाल्यावर 1 सेकंदही न जाऊ देता पुल-अप्स बारला लटकायचो आणि 10 पूल-अप्स न थांबता मारायचो तिथेच लगेच बाजूला 20 पुश-अप्स काढायचो . 10 पुल-अप्स काढल्यानंतर हात इतके दुखायचे की अजून काही करण्याची इच्छा शिल्लक नसायची तरीही थांबून त्रास होत असताना पुढेच 20 पुश-अप्स काढायचोच. कधी कधी तर इतका त्रास की अक्षरशः 10 12 पुल-अप्स नंतर ग्राउंड वरच्या माती वर  झोपून घ्यायचो. आणी एवढं केल्यानंतरही एक गोष्ट राहायची सीट-अप्स हे तर होणाऱ्या त्रासामुळे 1 2 वेला केलंच नाही. तरी जमेल तसं झोपून मातीवर लोळून कारायचोच.
तिसऱ्या दिवसापासून थोडा आत्मविश्वास यायला सुरुवात झाली 9:53 ऐवजी  8:50  मधेच 1600 मीटर अंतर पळालो.
पुल-अप्स तर पहिल्या दिवसापासूनच व्यवस्थित निघायचे याला महत्वाचं करण म्हणजे मी 8वी ला असताना पप्पानी घराच्या मागच्या पडवी मध्ये एक लोखंडी रॉड सायकलची चैन आणि दोरी च्या साहाय्याने अडकवला होता.  त्यामुळे 8वी पासूनच पुल-अप्स ची सवय होती.
मी एका कागदावर सकाळ आणी संध्याकाळ आशा दोन्ही वेळेच्या रनिंग च्या टाइमची नोंद ठेवायला सुरुवात केली.
सुरवातीचे 4 5 दिवस दोन्ही वेळेमध्ये काही फरक पडत नव्हता व आता दोन्ही वेळेला प्रॅक्टिस म्हणजे अंगही खूप दुखायला लागलं होतं.
मधल्या दिवसांमध्ये मी गुरुचरित्र च एकदिवसीय पारायणं करायच ठरवलं आणि पहाटे चार ते दुपारी 3 या वेळेत संपूर्ण गुरुचरित्र वाचून काढलं कधी एवढ्या जास्त वेळ बसायची सवय नसल्याने बसून बसून पायांना खूप त्रास होत होता.
तरीही त्याच दिवशी रात्री 10 वाजता जिमखाना ग्राउंड वर गेलो आणि 1600 मीटर पळालो. सकाळी पारायणाला बसल्यामुळे वेळ मिळाला नव्हता आणि दिवस खूप कमी राहिले होते.
अमितला फोन केला आणि कळालं की त्याची सीईटी ची परीक्षा असल्याने तो येऊ शकणार नव्हता.
लेखी परीक्षेचा अभ्यासासाठी मागच्या वर्षीचा पेपर इंटरनेट वरून डाउनलोड केला. 
आणि त्यातले अर्धे प्रश्न लगेच सोडवता आले. मला लहानपणी पासूनच इतिहास भुगोल ह्या विषयांची आवड होती.  दोन वर्षे सैनिक स्कूलला असताना जनरल नॉलेज खूप चांगलं झालं होतं.
लेखी पेपर मध्ये मुख्यतः दोन पेपर असतात
इंग्लिश आणि रिझनिंग व जनरल नॉलेज.
हे दोन्ही पेपर सिबीएससी  पॅटर्न नुसार असतात. इंग्लिशचे 20 आणि रिझनिंग व जनरल नॉलेजचे 30 असे एकूण 50 प्रश्न 45 मिनिटांमध्ये सोडवावे लागतात.
मी निर्णय घेतला की आपल्याला लेखी परिक्षा सोडवू शकतो म्हणून रनिंग वर लक्ष्य देऊ. कारण पहिली अट अशी होती की फिजिकल फिटनेस टेस्ट पास केल्याशिवाय लेखी परीक्षेला बसता येणार नव्हतं.
अजून जोराने प्रॅक्टिस सुरू केली पण 1600 मी. साठी लागणारी वेळ कमी होत नव्हती. दिवस रात्र प्रयत्न सुरू होते. पण वेळ बसत नसल्याने निराशाच मिळाली. 5 दिवस उरले होते, आजोबांना घेऊन सरळ रस्त्यावर 1600 मी. गाडीच्या साह्याने मोजले व शेवटचा तिने काढायचा ठरवलं, सुरुवात केली आणि खूप जोरात पळालो आणि वेळ आली 7:33 तब्बल 1:10 वेळ कमी लागला होता.  थोडा आनंद झाला होता अजूनही 1:30 सेकंद वेळ कमी करायची होती.
आमच्याच नगरामध्ये एअर फोर्स मधुन निवृत्त झालेले एक सर राहातात. त्याना भेटायला गेलो आणि भरतीची बातमी दाखवली व मला मार्गदर्शन करायला सांगितलं.
त्यांनी त्यांची कौटुंबिक परिस्थिती भूतकाळात घडलेल्या गोष्टी व त्यांनी केलेले प्रयत्न ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. सांगताना त्यांच्या व माझ्या दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं, त्यांनी सांगितलेल्या 90% गोष्टी माझ्या आयुष्यात जसाच्या तश्या घडल्या होत्या. त्यांनी मला असलेल्या सगळ्या शंका दूर केल्या आणि सांगितलं की तुझ्या कडे अजून 5 दिवस आहेत त्यांचं सोनं कर, दिवस रात्र मेहनत घे, एकदा तुझी निवड झाली की तुच बघ तुझं आयुष्य घरची परिस्थिती कशी बदलते.
ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्ट भेटली. पुन्हा पेटून उठलो अजून जोमाने तयारी करायला लागलो. 4 मे ला  संध्याकाळी प्रॅक्टिस करत असताना 1 शालेय मित्र संकेत पाठक भेटला. तोही प्रॅक्टिस साठी आला होता. मी त्याला भरती बद्दल सांगितलं व तो माझ्या सोबत येण्यासाठी तयार  झाला. मलाही आनंद झाला होता की एवढ्या 800 किलोमीटर लांब जाण्यासाठी कोणीतरी सोबत आहे. त्याने त्याच्या अजुन दोन मित्रांना सांगितलं सुरज आणि सर्वेश. सुरज माझाही मित्र होताच पहिल्या पासुन.
मी सुरज, संकेत आणि सर्वेश असे एकुण चार जण भरती साठी जाणार होतो. आम्ही सांगली जवळचे रेल्वे स्टेशन इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली पण आम्हाला जवळच एकही स्टेशन सापडलं नाही. आम्ही एस टी महामंडळाच्या बसने जाण्याचे ठरवले, लगेच नाशिकरोडच्या बस स्थानकावर जाऊन चौकशी केली, आम्हाला नाशिक-तासगाव अशा बसची माहिती मिळाली. तासगाव म्हणजे भरतीचे ठिकाण. थेट आम्ही भरतीच्या ठिकाणावर पोहचणार म्हणून ह्याच बसने जायचं ठरवलं. 6 मे जवळ जवळ पूर्ण तयारी झाली होती, जेवण झाल्यावर टीव्ही बघायला बसलो, भाग मिल्खा भाग  मुव्ही लागला होता, आई म्हणाली उद्या जायचं आहे झोप लवकर. पण मी पूर्ण मुव्ही बघितला. संकेतने खात्री करून घेण्यासाठी परत बस स्थानकावर कॉल केला त्यांनी सांगितलं की ती बस ज्यादा वाहतूक बस असल्याने उद्या येईल की नाही सांगता येणार नाही.  आम्ही सर्वांनी पहाटे 5 च्या सांगली बसने जायचं ठरवलं.
सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित घेतल्या पण सरांना भेटता आलं नाही , ठरल्याप्रमाणे 4:45 ला सगळे जमलो आजोबा बस स्टॅन्ड वर सोडायला आले होते, संकेत वडिलांनी सल्ला दिला की ही तुमची पहिली वेळ आहे तेव्हा आपण भरती झालो पाहिजे अस काही नाही तुमचे प्रयन्त करा पण जर अपयश आले तर ताण घेऊ नका तुम्हाला अनुभव तरी येईल.
5 वाजले बस अचुक वेळेवर आली आम्ही चौघे जण बस मध्ये बसलो. सकाळची बस  व पहिलाच स्टॉप असल्याने आम्हाला बसायला जागा मिळाली. बस सुरू झाली कंडक्टर काकांनी विचारलं कुठे जायचं आम्ही सांगितलं सांगली, बहुतेक आमचे बारीक केलेले सैनिकांसारखे केस पाहून ते म्हणाले भरतीला चालले का पोरांनो आम्ही आनंदाने सांगितलं हो. कुठे आहे ही भरती सुरज म्हणाला तासगाव ला आहे काका. अरे म कऱ्हाडच तिकीट काढतो म्हणजे तुम्हाला जवळ पडेल व पैसे ही कमी लागतील, आम्ही सर्वांनी सांगितलं हो चालेल तस करा.  त्यांनी भरतीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रवास चालू झाला नाशिक ते कऱ्हाड, आमच्या गप्पा ही सुरू झाल्या मी सर्वेशला पहिल्यांदा भेटलो संकेतने त्याची व माझी ओळख करून दिली. त्याला ह्याआधी 1 पोलीस व 1 आर्मी अश्या 2 भरतीचा अनुभव होता.
आणि तो 1600 मी. 5:40 च्या आतच पाळतो, हे ऐकल्यावर अजून आनंद झाला. ठरवलं की आता काही झालं तरी ह्याच्या सोबतच पळायचं ह्याला कोणत्याही परिस्थितीत सोडायच नाही. तो मागच्या दोन्ही भरतीमध्ये लेखी परीक्षेला बाहेर पडला होता. सकाळी येतांना सर्वांनी घरून 4-5 पोळ्या व भाजी सोबत आणली होती. पण भुक कोणालाही लागली नव्हती दुपारी 11च्या  वेळेला आम्ही पुण्याच्या पुढे आलो होतो तेव्हा थोडस खाल्लं होत. सुरज आम्हाला सर्वाना मोटीवेशनल गोष्टी सांगत होता. आम्ही आता सगळे भरती होणारच हीच गोष्ट सगळ्यांच्या मनात होती. संध्याकाळी 4 वाजता कऱ्हाडला पोहचलो. तेथून तासगाव बसमध्ये बसलो आणि 2 तासांनी तासगवला पोहचलो. उतरल्यावर पहिल्यांदा राहण्यासाठी व जेवणासाठी हॉटेल बघायला सुरुवात केली. तासगाव बस स्थानकाबाहेरच मोठा फलक लावला होता "भारतीय वायुसेना सैनिक भरती साठी आलेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक स्वागत."त्या खाली लिहले होते "सर्व उमेदवारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे". हे वाचून आनंद झाला कारण पुढच्या दोन दिवस राहण्यासाठी लागणारा खर्च वाचणार होता. पहिले एक छोटं हॉटेल बघितलं आणि हॉटेल मालकाला आम्ही घरून आणलेला डबा हॉटेलमध्येच खाऊ देण्यासाठी विनंती केली. ते तयार झाले पण काहीतरी घ्यावाच लागेल अशी अट घातली, आम्हाला भूक खूप लागली होती त्यामुळे आम्हीही तयार झालो. हॉटेल मधुन बाहेर आल्यावर बघितलं की भरतीसाठी येणाऱ्या मुलांची गर्दी वाढत चालली होती. थोडस टेन्शन यायला लागलं होतं. भारतीय वायुसेनेने एकूण सात हजार उमेदवारांची राहायची व्यवस्था तासगाव मधील विविध शाळा कॉलेज मंगलकार्यालाय अशा ठिकानी केली होती.
    कोणत्याही ठिकाणी जाण्याआधी आम्ही बस स्थानकासमोरच्या  चौफुलीवर असलेल्या एक ट्राफिक हवालदार पोलीस काकांजवळ गेलो व भरतीच्या ठिकाणा जवळच असलेल्या राहण्याच्या जागेची  विचारपूस केली. त्यांनी विचारलं तुम्ही भरती साठी आलेले आहेत कुठून आले . आम्ही सांगितलं नाशिक जिल्हा. ते ऐकून आच्छार्यचकित झाले एवढ्या लांब 600 किलोमीटर आम्ही भरतीसाठी आलो आहे. त्यांनी विचारलं की तुमची वेळ किती आहे 1600 साठी मी म्हणालो 5:40 मध्ये आम्ही पळू शकतो. ते हसायला लागले अरे 5:40 मध्ये पोरी सुध्दा पळतात, तुमची वेळ 4 मिनिटे, 4:20 , 4:40 किंवा 5 मिनिटांपेक्षा कमीच असली पाहिजे. उद्या सकाळी तिथे माझी ड्युटी आहे बघतो कस पळत नाही तुम्ही कुत्रा मग लागल्यागत पळा पोरांनो आणि आईवडिलांची स्वप्ने आणि महत्त्वाचे म्हणजे तुमचं ध्येय पूर्ण करा. मी 50-55 वर्षाचा माणूस असूनही 4:30 मध्ये 1600 मीटर  पळतो. आम्ही त्यांना धन्यवाद म्हणून त्यांचा निरोप घेतला. आता आमचं काम होत गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिक शाळेजवळील ठिकाणी रहायचं. बस स्टॅन्ड पासून ते फक्त तीन किलोमीटर लांब होत. आम्ही गेलो ठिकाण बघितलं गेट बंद होत कोणालाही आत प्रवेश नव्हता, बाहेरूनच परत आलो. सर्वात पहिले तेथे जवळच असलेल्या एका महाविद्यालयात थांबायच ठरवलं तिथे गेलो नोंदणी केली आत गेलो तर तिथे कॉलेजच्या नवीन इमारतीच बांधकाम चालू होतं. सर्वात पहिले आम्ही फ्रेश झालो सकाळच्या प्रवासाने अंगात कुणकुण सुरू झाली होती. आणि फेर-फटका मारायला बाहेर पडलो. पण एका मंगलकार्यालायात अजून चांगली सुविधा होती पंखा, स्वच्छ जागा आणि भरपुर सुविधा उपलब्ध होत्या. आम्ही तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. भरतीला येणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढत होती. आमच्या प्राथमिक अंदाजवरून दोन हजार तरी आले असतील असं वाटलं. सकाळी घरून आणलेला डबा आम्ही खाल्ला. आम्हाला अजून एक मुलगा भेटला तो सुरजचा मित्र होता अनुज. आणि आता आम्ही एकूण पाच जण झालो होतो. सुरज आणि त्याच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या ते त्यांचे भोंसला मिलिटरी स्कूलचे अनुभव व त्यांनी केलेली मस्ती आम्हाला सांगत होते. रात्री 11 वाजले झोपायला. सकाळी 4 वाजता उठलो व्यवस्थित तयारी करून सेंटर वर जाण्यासाठी तयार झालो. रात्रीच बाजारातुन आणलेली केळी खाल्ली.
एकदा देवाच नामस्मरण केल. आणि आम्ही निघालो. आमच्या आधीच तिथे खूप गर्दी झालेली होती. भारतीय वायुसेनेचे मोठे अधिकारी यायला सुरुवात झाली होती. सकाळी 6 वाजले भरतीला आलेल्या सर्व उमेदवारांना एका मोठ्या मंडपामध्ये एकत्रित करून भरतीचे प्रमुख असलेले विंग कमांडर 'म भोग' सरांनी भरतीविषयी सर्व प्राथमिक माहिती दिली. एकूण पाच हजार तीनशे उमेदवार आले होते. आम्हाला एक नंबर देण्यात आला आणि त्याच नंबरचे स्टिकर आमच्या सामनाच्या बॅगेवर चिटकवण्यात आले. इतक्या चांगल्या पद्धतीने शिस्त व नियोजन मी पहिल्यांदाच बघत होतो. भारतीय वायुसेनेचे सहा गरुड कमांडो तिथे आमची फिजिकल टेस्ट घेण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे बघुन प्रोत्साहन मिळालं. 200 चे गट करण्यात आले व जो 5:40 सेकंदात 1600 मीटर अंतर पळेल तोच पुढच्या टेस्ट साठी जाईल. सुरुवात झाली पहिल्या 200 मधून फक्त 15 जण आले. मी तिसऱ्या बॅच मध्ये होतो. खुप टेन्शन आलं होतं. काहीही झालं तरी आज पळायचंच ठरवलं होतं आणि सर्वेश ला सोडायच नाही.आम्हाला उभं केलं, माझे सगळे मित्र पुढच्या रांगेत उभे होते. शिट्टी वाजली आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय असा एक मोठा जयघोष झाला. सगळे जोरात पळायला लागले थोडी धक्का-बुक्की झाल्यामुळे मी बाजूला थांबून घेतलं. एक-दोन जणांना दुखापत झाली. लगेच पळायला सुरुवात केली तो पर्यंत माझे सर्व मित्र खुप पुढे निघून गेले होते माझ्या पुढे दीडशेहून अधिक जण होते तरीही सतत पळत राहिलो जवळपास एक किलोमीटर अंतरावर कोणीच दिसलं नाही मला वाटलं की आपले सर्व मित्र सिलेक्ट झाले आता आपण काही सिलेक्ट होणार नाही आणि आपण थोड्या वेळाने घरी फोन करून सांगणार की माझं सिलेक्शन नाही झालं. एकदा डोळे बंद केले वडिलांचा व आईचा चेहरा आठवला डोळे उघडले आणि ठरवलं की काहीही झालं तरी पूर्ण करायचं थांबायचं नाही. मोठी पाऊले टाकायला सुरुवात केली खूप जोरात पळू लागलो पळालो-पळालो आणि शेवटी व्हायला हवे होते तेच झाले. मी 1600 मीटर 7मिनिटे व 23 सेकंदात पळणारा तिथे 5 मिनिटे आणि 28 सेकंदात पळालो होतो. थांबल्यावर समोर सर्व गोष्टी गोल फिरत होत्या, एकाच ठिकाणी उभं राहता येत नव्हतं. डोळ्यातून पाणी येत होतं. या सर्व गोष्टी घडत असताना माझी नजर सर्वेश, सुरज, संकेत ला शोधत होती. आम्हाला टोकन नंबर देण्यात आला. त्यानंतर आम्ही रनिंग पास झालेले सर्व एअर फोर्स च्या बस मध्ये बसवून मुख्य सेंटरवर नेले. जाताना सामानाची बॅग घेण्यासाठी बस थांबली तेव्हा मला संकेत ने आवाज दिला , आणि आम्ही नाशिकला जायला निघतो असे सांगुन निरोप घेतला. मला थोडं दुःख झालं होतं कारण माझा मित्रांपैकी कोणीही सिलेक्ट नव्हतं झालं.

सेंटरवर आमचं 10वी च पासिंग सर्टिफिकेट तपासून आमच्या जन्मतारीखेची खात्री करून घेतली. त्यानंतर पुल-अप्स, मी ज्या गरुड कमांडो कडे पुल-अप्स ची टेस्ट द्यायला गेलो त्यांनी सर्वांचे 10 पुल-अप्सची टेस्ट घेत होते परंतु माझे फक्त 8 ची टेस्ट घेतली. पुढची टेस्ट होती पुश-अप्सची तीही व्यवस्तीथ झाली आणि शेवटची टेस्ट सीट-अप्स  तेही नीट काढले. संपूर्ण फिजिकल फिटनेस टेस्ट पास झालो. सकाळ पासून काही खाल्ल नव्हतं खूप भूक लागली होती पण आमचे डॉक्युमेंट ची तपासणी चालू होती. आम्हाला एक तात्पुरता सीट नंबर देण्यात आला. संध्याकाळचे 5:30 वाजले होते, शेवटी एका स्थानिक व्यक्तीशी बोलुन वायुसेनेने जेवण मागवले भात आणि उसळची भाजी.  भाजी मध्ये पाणी आणि मसाला सोडून काहीच नव्हतं. पण पोटाला आराम मिळाला होता. त्यानंतर 6:30 ला लेखी परीक्षा सुरू झाली. 5 मिनिटांनंतर खूप जोरात वादळी पाऊस सुरू झाला. ज्या हॉल मध्ये बसलो होतो त्या हॉलच्या छतातून पाणी खाली पडायला सुरुवात झाली. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पेपर सोडवण्यासाठी नेऊन बसवले. पेपर 45 मिनिटांच्या आत सोडवायचा होता. पेपर झाला आणि त्यानंतर आम्हाला एक कायमस्वरूपी सीट नंबर देण्यात आला, आमचे फोटोही काढण्यात आले. निकाल लागला आणि पास झालो भरपूर मुले नापासही झाली होती त्यांना सेंटर मधून बाहेर सोडण्यात आलं. पुढची टेस्ट होती सायकॉलॉजि टेस्ट, ही 11:30 वाजता सुरू झाली. ही सुध्दा मी पास झालो. 1 वाजता आम्हाला सेंटरच्या बाहेर सोडण्यात आले. तासगाव नगर परिषदने आमच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती. रात्री 1:30 वाजता जेवण केलं त्यानंतर तिथेच झोपायची व्यवस्था होती. सकाळी 9 वाजता राहिलेल्या शेवटच्या टेस्ट साठी सेंटर वर जायचे होते. लवकर उठून तयार झालो त्यांनी नाष्टा दिला होता. थोडा वेळ बाकी होता जाण्यासाठी घरी फोन केला कालचा पूर्ण दिवस घरी काहीच संपर्क झाला नव्हता. सेंटरवर पोहचलो आम्ही 200 उमेदवार राहिलो होतो शेवटच्या टप्प्यात.
आमच्याकडुन फॉर्म भरून घ्यायला सुरुवात झाली. त्यानंतर 12:30 वाजता शेवटची टेस्ट ग्रुप डिस्कशन सुरू झाल. 15 जनांचे ग्रुप केले होते, मला विषय होता नियमित कॉलेज चांगले की इंटरनेटवरील कोर्सेस. मी 10वी, 11वी, 12वी आणि 13वी असे चारही वर्ष माझी पूर्ण उपस्थिती होती, एकही दिवस सुट्टी घेतली नव्हती त्यामुळे मी नियमित कॉलेजच चांगले आहे हा विषय प्रखरपणाने सर्वात पहिले मांडायला सुरुवात केली. सुरुवातीचे 2-3 मिनिटे कोणीच बोलले नाही. आणि शेवटी मीच केला. मी माझी बाजू खूप चांगल्या पद्धतीने मांडली होती, तीही इंग्रजी मध्ये मला विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता निकाल लागला, मी पास झालो होतो. खूप चांगलं वाटत होतं की सगळ्या टेस्ट पहिल्या टप्प्यात पास झालो. कालप्रमाणेच आजही दुपारच्या जेवणाला 5:30 झालेच होते. पण आज जेवण खूप चांगलं होत. आमच्या कडून वेगवेगळे 20-25 फॉर्म भरून घेतले. आणि त्यानंतरही मेडिकल साठी 6 फॉर्म भरून घेतले. शेवटी रात्री 11:30 वाजता आम्हाला मेडिकल ची तारीख व अपॉइंटमेंट लेटर दिले. 11 जुलैला पहिलीच बॅच मला भेटली. आम्हाला मेडिकल साठी सूचना देण्यात आल्या. 5300 उमेदवारांमधून आम्ही आता फक्त 165 राहिलो होतो. रात्री उशिरा 1 वाजता आम्ही बाहेर सेंटरच्या बाहेर सोडले. भूक खूप लागली होती, म्हणून आम्ही सिलेक्ट झालेले सर्व काल जिथे नगर परिषदने जेवनाची व्यवस्था केली होती तिथेच गेलो पण आज तिथे काहीच नव्हतं. संपूर्ण तासगाव झोपी गेले होत. रस्त्यावरही कोणीच नव्हतं. संपूर्ण गावात फिरलो कुठेच हॉटेल उघडे नव्हते. शेवटी पोलिसांची एक गाडी दिसली त्यांना सांगितल्यावर त्यांनी एका हॉटेल मालकाला हॉटेल उघडण्यास सांगितले पण ते म्हणाले की आता काहीच शिल्लक नाही फक्त एकच भाजी आहे. आम्ही त्यांना विनंती केली व शेवटी त्यांनी हॉटेल उघडले. सर्वांनी जेवण केले, नंतर काही जण मेडिकल असिस्टंट या पदासाठी परीक्षा देण्यास थांबले. मी काकांना फोन केला आणि मी या पदासाठी थांबत नाही असं सांगितलं, काकांनी होकार दिला. रात्र खूप झाल्यामुळे बसही बंद झाल्या होत्या. सकाळी 6 वाजता बस आहे असं कळालं. म झोपायचे कुठे हा प्रश्न होता. सर्वांनी मिळून तासगाव बस स्थानकावरच झोपण्याचा निर्णय घेतला.
         खूप छान झोप लागली, दोन्ही दिवसांची थकवा दूर झाला. सकाळी लवकर उठून तयार झालो 6 वाजले मी व पुण्याचा एक माझ्या बरोबर भरती झालेला संकेत पवार हा मित्र आम्ही सोबत पुणे पर्यंत रेल्वेने जायचे ठरवले. तासगाव जवळच 5 किलोमीटर अंतरावर बिलवडी रेल्वे स्टेशन आहे. आम्ही तिथे बसनि गेलो 8:30 च्या रेल्वेने पुण्याला जाण्यासाठी निघालो. निघतांना भरती झालेल्या सर्वांची भेट घेतली आणि फोन नंबरही. येताना संकेत आणि मी त्याने आणलेले बिस्कीट व रेल्वे मध्ये काही विकत घेऊन खाल्ले. संध्याकाळी 6 वाजता आम्ही पुण्याला पोहचलो. त्याने मला नासिक बस मध्ये बसवून निरोप घेतला. घरी फोन करून सांगितलं होतं की मी घरीच जेवायला येणार आहे. त्यामुळे बस एका हॉटेलवर थांबली होती तेव्हा भूक लागलेली असून सुद्धा मी जेवन केले नाही. शेवटी 18 तासांचा प्रवास संपला आणि मी नाशिकरोडला पोहचलो बाबा स्टॉपवर माझी वाट पाहत उभेच होते. गाडीवर बसलो आणि 11:20 घरी पोहचलो, मी घरी जाईपर्यंत घरातील कोणीच झोपलेलं नव्हतं. सर्वात आधी बाबांचे दर्शन घेतले, नंतर मला मिळालेले मेडिकल अपॉइंटमेंट लेटर सर्वांना दाखवले, सगळ्यांना खूप आनंद झाला होता. आणि मी माझे भरतीचा संपूर्ण अनुभव सांगितला, माझी भूक मी केव्हाच विसरून गेलो जवळजवळ 12:45 झाले होते. आई म्हणाली आता जेवण करून घे आणि नंतर सांग राहिलेलं. मी गेले 2 दिवस 1:30 वाजता रात्रीचे जेवण केलं होतं आणि आजही तीच वेळ आली होती. आईने सर्व गरमागरम वाढलं आणि मी पोट भरून जेवण केलं. आणि झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच उठलो. 11 मे तारीख होती,  बरोबर 2 महिन्यानंतर मेडिकल. सकाळी सरांकडे गेलो त्यांनाही सर्व सांगितलं ते खूप आनंदी झाले, आणि म्हणाले "मी सेवानिवृत्त झाल्यापासून तू पहिला मुलगा आहेस जो एवढे अडचणी पार करून निवड झालास".  त्यांनी मेडिकलसाठी काही सूचना केल्या आणि त्या सुचना पुढे 2 महिने पाळायला सांगितल्या आणि मी सुरुवातही केली. घरी येतांना सुरज आणि संकेतला फोन करून निवड झाल्याची बातमी दिली होती. त्यांनी जवळपास सर्व मित्रांना सांगितलं.
22 मे ला FyBsc चा निकाल लागला मला 73.86% मिळाले होते पण माझा फिजिक्स-I हा विषय राहिला होता घरच्यांनी खूप रागावलं पण भरती झाल्याचा आनंद असल्यामुळे तेही थोडं कमीच बोलले.
मी SyBsc ला ऍडमिशन घेतलं 1 जुलै पासून कॉलेज सुरु झाले मी पहिल्या दिवसापासून जायला सुरुवात केली. 10 दिवस राहिले होते मेडिकलला थोडी मनात भीती होती कारण पहिल्यांदाच अशाप्रकारच्या परीक्षेला सामोरं जाणार होतो.
दोन दिवस रहायचे कुठे हा प्रश्न होता.
खुप नातेवाईकांकडे चौकशी केली पण त्यांनी स्पष्ट होकार दिला नाही.
शेवटी NDA च्या 2 परीक्षा देण्यासाठी जिथे थांबलो होतो म्हणजे मावशीच्या घरी कल्याण ला थांबायचं ठरवले. मावशीला आईने फोन केला,मावशीचे 2 छोट्या खोल्यांचे घर तरी मावशीने ही लगेच होकार दिला.
10 तारखेला मी मावशीच्या घरी गेलो आणि मेडिकल साठी दिलेल्या सूचनेनुसार रात्री 8 वाजेच्या आत जेवण करून झोपलो
दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता उठून लवकर तयारी केली. 5:30 ची लोकलने 6:40 ला सायन स्टेशनवर पोहचलो. आणि 5 मिनिटांनी "स्टेशन मेडिकल सेंटर एअर फोर्स स्टेशन सायनला" पोहचलो. जवळपास पहिल्या बॅचचे सर्वच जण आले होते. 7:30 ला आम्हाला गेटच्या आतमध्ये घेतलं. आमचे अपॉइंटमेंट लेटरची तपासणी करून आम्हाला हॉस्पिटलमध्ये सोडण्यात आले.
आम्हाला मेडिकलपुरता एक चेस्ट नंबर देण्यात आला. त्यांनी पहिला प्रश्न विचारला की इथे शाकाहारी कोण आहे मी पटकन हात वरती केला, मला वाटलं नेहमी हा प्रश्न विचारल्यानंतर 4-5 तरी असतातच. पण काही क्षणातच सर्व माझ्या कडे बघू लागले मी मागे पुढे वळून पाहिले तर संपूर्ण 45 च्या बॅचमध्ये मी फक्त एकटाच शाकाहारी होतो. मला उठवले व सांगितले की आम्ही तुझी निवड नाही करू शकत, तू इथे कशासाठी आला आहेस, आम्ही शाकाहारी उमेदवारांना तिथे पाठवतच नाही. तू ज्या गोष्टींचा कधी विचारही केला नसेल आशा सर्व गोष्टी तुला खाव्या लागतील. मी होकार दिला आणि सांगितलं सर मी सर्व गोष्टी खायला आणि करायला तयार आहे, ते म्हणाले तुझी निवड झाली तर तुला उद्यापासूनच मांसाहार खायला सुरुवात कारावी लागेल. मी हो म्हणालो आणि मेडिकलला सुरुवात झाली.
सर्वात पहिले उजव्या हातातुन रक्त चाचणी करिता काढण्यात आले त्यानंतर  ECG (electro cardio graph) काढण्यात आला. मी माझ्या 45 च्या बॅच मधून दुसरा होतो ज्याचा ECG नॉर्मल रेषेत आला.
आम्हाला नाष्टा करण्यासाठी थोडा वेळ दिला.
नाष्टा झाल्यावर छातीचा X-Ray काढला.
पुन्हा एकदा रक्त डाव्या हातातून काढण्यात आले. दुपारी थोडा वेळ जेवणासाठी व आरामासाठी देण्यात आला होता. त्यानंतर 6 मीटर अंतरावरून ऐकण्याची क्षमता तपासली गेली. तसेच 6 मीटर अंतरावरून आमची दृष्टी तपासली. इथपर्यंत सर्व  चाचण्यांमध्ये मी योग्य होतो. यानंतर एकापाठोपाठ एक अशा खालील प्रमाणे चाचण्या झाल्या,
1) उंची
2) छाती
3) पायांची कामरेपासून लांबी
4) वजन
5) रंग आंधळेपणा
6) रक्तदाब
7) दातांची संख्या व मजबुत स्थितीतील दात
हे सर्व तपासल्यानंतर संपुर्ण शरीराची बारकाईने तपासणी करण्यात आली.
सर्व चाचण्या झाल्या आता फक्त मेडिकलच्या निकालाची वाट बघत होते सर्व जण. एक मेडिकल अससिस्टंट आले आणि ते म्हणाले, "मी इथुन पुढे जे नाव वाचेल त्यांनी आपले समान घ्यायचे आणि ह्या हॉलच्या भाहेर जायचं, इथे थांबून तुमचा काहीही उपयोग नाही". त्यांनी नाव वाचायला सुरुवात केली आणि 4-5 उमेद्वारांनंतर माझे नाव घेतले. माझ्या हृदयाचे ठोके वाढले, आम्ही 45 पैकी 23 जण बॅग घेऊन बाहेर निघालो. आम्हाला जिना खाली उतरायच्या आतच दुसऱ्या मेडिकल अससिस्टंटने आम्हाला जिन्याच्या शेजारीच असलेल्या एका ऑफिसमध्ये बोलावले व बसण्यास सांगितले.
आम्ही बसल्यानंतर बोलायला सुरुवात केली, तेव्हा समोर बसलेले ऑफीसर ओरडले आणि विचारलं टेन्शन आलय का तुम्हाला. आमच्यातील कोणीही काहीच बोललं नाही मी हळू आवाजात हो सर असे म्हणालो. ते सर्व 7-8 जण एकदम हसायला लागले आणि ऑफिसर म्हणाले घाबरू नका तुम्ही सर्व जण मेडिकली फिट आहेत आणि त्या हॉलमध्ये बसलेल्या उमेदवारांच्या शरीरामध्ये काही थोड्याश्या उणीव आहेत. खूप आनंद झाला होता सर्वांना आणि बहुतेक सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू आले होते. आम्हाला पुढील  प्रक्रियेसाठी काही सूचना दिल्या. आणि शेवटी आम्हाला मेडिकलचं फिटनेस सर्टिफिकेट (ग्रीन कार्ड) देण्यात आलं. बाहेर पडलो घरी फोन करून ही बातमी दिली. आणि 9:15 च्या लोकलने सायन वरून कल्याणला मावशीकडे आलो. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कल्याणवरून पंचवटी एक्सप्रेसने घरी नाशिकला आलो.

एवढं सगळं एका दमात सांगून सांगून त्याला फेस आला, अन मी ऐकून आश्चर्य चकित झालो,,,,,

कि एक भविष्यातला, जो कि इंडियाच्या स्पेशल एअरफोर्स मधला गरुड कमांडो होणार आहे, त्यासोबत माझी मैत्री, हेच खूप माझ्यासाठी, त्यात तो वयाने 2 ते 3 वर्षाने लहान, आणि ती चाचणी म्हणजे तारेवरच्या कसरती पलीकडची चाचणी, ती तो पूर्ण होऊन त्याच्या ट्रेनिंग च्या लेटर च्या प्रतीक्षेत आहे,
माझा काहीकाळ हँग पडलेला मेंधू मला ओरडून ओरडून सांगत होता, कि शिक काही याच्याकडून शिक....!

मी त्याला म्हणलो काय रे विवेक मला विश्वास बसत नाही की कोणाची इतकी जिद्द असते,
त्यावर त्याचं आधीच बोलणं मला आठवलं,
तो नेहमी म्हणायचा, कि गणेश दादा मी तुला बघूनच ग्रंथालयात बसायला लागलो,..!

यागोष्टीने माझे खरच डोळे उघडले,
देव जाणे त्याने माझ्या बद्दल काय विचार केला आणि त्याने तस वागायला सुरुवात केली!!
माझं वागणं किंवा माझ्यातल्या काही सकारात्मक गोष्टी पाहून त्याने त्याच ध्येय प्राप्त केलं,

(तस त्याच्या या प्राप्ती माघे बाकी गोष्टीही असतीलच, पण फुल ना, फुलाची पाकळी म्हणून माझही अस्तित्व असावं....!)

कधी काळी मी त्याला सांगितलं होतं, माझ्या बद्दल तुला जे वाटतं ते लिही, पण त्याने त्याच्या बद्दल मलाच नसांगता लिहायला लावलं....!

व्यक्ती असावा तर असा, माझ्या प्रोग्रेस मधे या व्यक्तीचा ही सिंहाचा वाटा असेल.....!

             (एक नवा विवेकानंद.....!)

                     - ग. सु. डोंगरे
                    (8605522285)
 

Comments

Popular posts from this blog

बस फुरसत ही फुरसत...!

आई चे अश्रु....!

शुभ मंगल सावधान....!